जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाचा आरोप तर गिरीश महाजन यांना ‘जामनेर’ची धमकी


जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाचा आरोप तर गिरीश महाजन यांना ‘जामनेर’ची धमकी

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघावरुन धमकी दिली आहे.

 

तर ‘जातीवादी पालकमंत्री’ म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. तसेच मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टोकाची टीका केली आहे. दरम्यान, “आपल्या काही चुका या निवडणुकीत झाल्यात त्या पुन्हा होऊ देऊ नका. तुम्ही लोकसभेला एकगठ्ठा मतदान केले. पण काही मराठ्यांनी ज्यांना मतदान करायचे नव्हते त्याला मतदान केले. कारण मी संगितले होते की, कोणाला द्यायचे हे सांगितले नव्हते. म्हणून 10 हजार मतं दुसऱ्याला पडले आणि 20 हजार मतदारांनी मतदानच केले नाही”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

 

“देव जरी आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की उगाच भांडण वाढवू देऊ नका. मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे. जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे. धनगर समाजाच्या लोकांनी आपल्या नेत्यांना सांगावे. धनगर समाजाच्या नेत्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही मध्ये येऊ नका”, असंदेखील आवाहन मनोज जरांगेंनी यावेळी केलं.

Advertisement

 

मनोज जरांगे गिरीश महाजन यांना उद्देशून काय म्हणाले?

 

“गिरीश महाजन साहेब, तुम्ही कितीही डाव टाका. मी सुद्धा आरक्षणातला बाप आहे आणि जातवान क्षत्रिय मराठा आहे. तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर तुम्ही उड्या काय मारायला लागले, तुमच्या डोक्यात हवा घुसली, मंत्रि‍पदाची मस्ती घुसली. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात नाही, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे. ते शेवटी मराठे आहेत. आम्ही तुमच्या सुद्धा धुऱ्या वर करु शकतो”, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना दिला.

 

जरांगेंचा धनंजय मुंडेंवर जातीवादाचा आरोप

 

मनोज जरांगे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादाचा आरोप केला आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांग्यावरुन बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली. तरीही मी सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार. बीडच्या पालकमंत्र्यांना असा जातीवाद शोभत नाही”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

 

 

जरांगेंची भुजबळांवर टोकाची टीका

 

मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अतिशय टोकाची टीका केली. “अरे तुझी आणि अक्कलेची केव्हा भेट झाली होती की नाही, की तेव्हा अक्कल वाटताना अकलेचं दुकानच बंद होतं का? ते बधिर डोक्याचंच आहे. काय करावं याचीदेखील अक्कल पाहिजे”, अशा खोचक शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!