मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर धाडधाड आरोप, राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत बरसले


मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर धाडधाड आरोप, राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत बरसले

मुंबई – राज्य सरकारने मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर काल विरोधकांनी बहिष्कार टाकला. यानंतर विधानसभेत सभागृहात सत्ताधाऱ्यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मुद्द्यावर थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर धाडधाड आरोप केले.

 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर भर सभागृहात सडकून टीका केली. यावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण राधाकृष्ण विखे पाटील हे सभागृहात आक्रमकपणे बोलत राहिले. “लोकांना झुलवत ठेवणे हे षडयंत्र आहे. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत”, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

 

“अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी ब्र शब्द काढला नाही, कधी ते मराठा समाजाच्या मोर्चात दिसले नाहीत, मराठ्यांच्याबद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली नाही. खरं म्हणजे यापूर्वी सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर केलं. सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांचे मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते. त्यामुळे ते आरक्षण गेलं”, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

Advertisement

 

‘आरक्षणाचा नेमका शत्रू कोण ते ओळखा’

 

“फक्त समाजा-समाजात दुही माजवायची. समाजाच्या विकासाकरता कुणी भूमिका मांडायची नाही. त्यामुळे मी या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांना आमचं आवाहन आहे, या आरक्षणाचं नेमकं शत्रू कोण आहेत, आरक्षण कोण देत नाहीत हे त्यांनी ओळखलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी अशा लोकांचे गावबंद केलं पाहिजे”, असं विखे पाटील म्हणाले.

 

‘विरोधी पक्ष आज उघडा पडला’

 

“मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्हाला राजकारण करायचं नाही. पण सरकार एक पाऊल पुढे टाकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने 10 टक्के आरक्षण देत आहेत. पण विरोधी पक्ष आज बहिष्कार टाकायची भूमिका घेऊन त्यांचं बेगडी प्रेम दाखवत आहे. यामुळे विरोधी पक्ष आज उघडा पडला आहे. याचा निषेध आम्ही करतो. आंदोलनकर्त्याने ओळखलं पाहिजे तुमचे शत्रू कोण आहेत?”, असं देखील विखे पाटील म्हणाले.

 

“काही नेत्यांना मराठा म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. आम्ही विचारलं की, तुम्ही मराठा आहात का? तो म्हणाला आम्ही जातीवर विश्वास ठेवत नाही. आमची अपेक्षा आहे की, त्यांच्या नेत्याने एक मराठा लाख मराठा म्हणनू दाखवावं. पण त्यांच्यामध्ये ती दानत नाही. म्हणून फक्त खोटं बोल आणि रेटून बोल असं चालू आहे. विरोधक समाजाचा विश्वासघात करत आहेत. हा समाज तुम्हाला माफ करणार नाही”, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!