काँग्रेसला इशारा देणाऱ्या आडम मास्तरांना फडणवीसांचा सल्ला; सोलापूर शहर मध्य’चे काय आहे राजकारण?
काँग्रेसला इशारा देणाऱ्या आडम मास्तरांना फडणवीसांचा सल्ला; सोलापूर शहर मध्य’चे काय आहे राजकारण?
सोलापूर – सोलापूर शहर मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने न सोडल्याने चिडलेले माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा दिला आहे.
येत्या चार नोव्हेंबर रोजी प्रणिती शिंदे यांच्याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोण उपयोगी आहेत आणि कोण उपयोग करून घेतात, याचा विचार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे, ‘ असा सल्ला त्यांनी दिला.
महाविकास आघाडीत असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडावा, यासाठी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी शेवटपर्यंत प्रयत्न चालवले आहेत. त्यातूनच त्यांनी येत्या चार नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्याच वेळी चार तारखेपर्यंत काँग्रेसने आम्हाला जागा सोडली नाही तर आम्ही पाच तारखेला काँग्रेस विशेषतः खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी गौप्यस्फोट करू, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत काँग्रेसकडून सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून देवेंद्र कोठे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून उमदेवारी मिळेल, या भरवशावर बसलेल्या आडम मास्तर यांना मात्र पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागत आहे, त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.
आडम मास्तर यांच्या दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आडम मास्तरांना चांगलं कोण आणि वाईट कोण, याची ओळखच पटलेली नाही. आडम मास्तर हे विरोधी विचाराचे असतानाही गरिबाला घर दिले पाहिजे; म्हणून तीस हजार घरं आडम मास्तर यांच्या संस्थेच्या माध्यमातून बांधून दिलेली आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने माजी आमदार नरसय्या आडम यांना चॉकलेट दिलं, त्यामुळे त्या वेळी ते काँग्रेससोबत गेले. आता त्यांच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे पुढं काय करायचं, हे त्यांनी ठरवायचं आहे. कोण उपयोगी आहेत आणि कोण उपयोग करून घेतात, याचा विचार आडम मास्तर यांच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.