‘पराभूत होणे हीच इच्‍छा!’: जाणून घ्‍या २३८ वेळा निवडणूक लढविणार्‍या ‘इलेक्‍शन किंग’विषयी


‘पराभूत होणे हीच इच्‍छा!’: जाणून घ्‍या २३८ वेळा निवडणूक लढविणार्‍या ‘इलेक्‍शन किंग’विषयी

तामिळनाडू – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. सर्वत्र राजकारणावरील चर्चांना उधाण आलं आहे. आता निवडणूक लढवणे हा छंद असू शकतो, असे तुम्‍हाला सांगितले तर तुमच्‍या भुवया नक्‍कीच उंचावतील.मात्र वास्‍तवात तामिळनाडूतील मेत्तूर येथील रहिवासी के पद्मराजन यांना हा छंद आहे! त्‍यांनी आतापर्यंत तब्‍बल २३८ निवडणुका लढवल्‍या आहेत. विशेष म्‍हणजे निवडणुकांमध्‍ये पराभूत झाले तरी या छंदामुळे त्‍याचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. जाणून घेवूया ‘अजब’ छंद असणार्‍या के पद्मराजन यांच्‍याविषयी…

यंदा पद्मराजन धर्मपुरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्‍हणून रिंगणात

आतापर्यंत २३८वेळा विविध निवडणुका लढविणारे पद्मराजन यंदा तामिळनाडूतील धर्मपुरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्‍यांनी २३९ वेळा निवडणूक लढविण्‍यासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रत्‍येक निवडणुकीत पराभव होत असला तरी त्‍यांनी लाखो रुपये खर्च करुन हा जगावेगळा छंद जोपासला आहे. आजपर्यंत त्‍यांनी स्थानिकसह लोकसभेपर्यंतच्‍या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.

दिग्‍गज नेत्‍यांविरोधात निवडणूक लढवली

के पद्मराजन यांनी आतापर्यंत विविध पक्षांमधील अनेक दिग्‍गज नेत्‍यांविरोधात लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्‍यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांच्‍यासह अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.

‘इलेक्शन किंग’ अशी ओळख, ‘नकोसा’ विक्रमही नावावर

Advertisement

टायर व्यावसायिक असणारे पद्मराजन हे ‘इलेक्शन किंग’ म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. त्‍यांनी १९८६मध्‍ये पहिल्यांदा मेत्तूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यानंतर आजपर्यंत २३९ निवडणुकांसाठी अर्ज दाखल केले. आज सर्वाधिकवेळा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार असाही नकोसा असणार्‍या विक्रमामुळे त्‍यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्‍ये नोंदले गेले आहे. त्‍याचबरोबर ‘भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार’ म्हणून डॉ. पद्मराजन यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.

मला फक्‍त पराभूत होणे आवडते

वारंवार निवडणूक लढवण्यामागचे कारण स्पष्ट करताना पद्मराजन म्हणाले, ‘मी आतापर्यंत २३९ अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत मला फक्त हरणे आवडते. मी विश्वविक्रम करण्यासाठी स्पर्धा करत आहे. एका निवडणुकीत मला सर्वाधिक सहा हजार मते मिळाली होती. आत्तापर्यंत मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, द्रमुक प्रमुख करुणानिधी, AIADMK प्रमुख जयललिता, बीएस येडियुरप्पा यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.

यश सारेच अनुभवतात;पण अपयश पुन्‍हा पुन्‍हा अभुवता येते…

‘मला निवडणूक जिंकायची नाही, मला फक्त हरायचे आहे. यश एकदाच अनुभवता येते, तर अपयश पुन्हा पुन्हा अनुभवता येते,’ असे के पद्मराजन सांगतात. १९८६ पासून आजपर्यंत मी निवडणूक नामांकनासाठी एक कोटी रुपये जमा केले आहेत. मी माझ्या घराजवळ पंक्चरचे छोटे दुकान चालवतो. या कामातून मिळालेल्या पैशातून मी या ठेवी भरणार आहे. मी अध्यक्षपदाच्या निवडणुका, महामंडळ आणि प्रभाग निवडणुकांसह सर्व निवडणुका लढवल्या आहेत. यापुढेही मी निवडणूक लढवणार असल्‍याचा निर्धारही ते व्‍यक्‍त करतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!