बीडमध्ये महात्मा फुले पुतळ्याजवळ समता परिषदेचे काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन
बीड -ओबीसी समाज हा भाजपाचा डीएनए आहे असे म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ज्यांना छगनराव भुजबळ यांच्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा निवडून आणता आल्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी देशातील तमाम ओबीसी समाजाचा बुलंद आवाज असलेल्या कणखर नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळातून डावलून देशातील ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. ज्या ओबीसी समाजामुळे राज्यात महायुती सरकार आले त्या ओबीसी समाजावरील हा मोठा अन्याय असून छगनराव भुजबळ यांच्या पाठीशी उभा असलेल्या ओबीसी समाजाचा अवमान केल्याबद्दल बीड शहरामध्ये समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या वतीने काळ्या फिती बांधून भव्य धरणे आंदोलन करून महायुती सरकार आणि अजित पवार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
नुकतेच मंत्री मंडळाची यादी जाहीर करून अनेक आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली, मात्र यामध्ये ओबीसी समाजाचा बुलंद आवाज असलेल्या आ. छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. हा छगनराव भुजबळ यांचा अवमान नसून देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाला असल्याचे वक्तव्य समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा राज्य अन्न आयोगाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे. मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी बीड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर समता परिषदेच्या वतीने निषेध धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ॲड. सुभाष राऊत म्हणाले की, माहिती सरकारला महाराष्ट्रातून सर्वाधिक जागी विजय प्राप्त झालेला आहे. यामध्ये आ. छगनराव भुजबळ यांचा मोठा वाटा आहे. आ. छगनराव भुजबळ यांच्यामुळे राज्यातील तमाम ओबीसी समाज महायुती सरकारच्या पाठीशी उभा राहून मतदान रुपी आशीर्वाद देऊन राज्यात 250 पेक्षा अधिक जागा महायुती सरकारला मिळाल्या आहेत.
मात्र महायुती सरकारने आ. छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या शपथविधीपासून वंचित ठेवल्याने राज्यातील ओबीसी समाजामध्ये महायुती सरकार बद्दल रोष निर्माण झाला आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी सभागृह आणि सभागृहाचे बाहेर रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची काम आ. छगनराव भुजबळ यांनी गेल्या 40 वर्षापासून अखंडितपणे केलेले आहे. वेळप्रसंगी मंत्री पदाचा राजीनामा देऊन ओबीसी समाजासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून लढाई लढलेली आहे. यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे. यामुळेच महायुती सरकारला विजयश्री प्राप्त झाला. मात्र ओबीसी समाजाच्या राष्ट्रीय नेत्याला मंत्रिमंडळातून डावल्यामुळे ओबीसी समाजामध्ये महायुती सरकार बाबत रोष निर्माण झाला आहे. याचा निषेध राज्यात सर्वत्र होत असून बीड शहरामध्ये मंगळवार रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्यासमोर समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात येऊन माहिती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या बद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष निखील शिंदे, राम मेजर राऊत, नितीन राऊत, धनंजय काळे, सुमंत राऊत, सावता काळे, मंगेश जमदाडे, संग्राम भोकरे, युवराज गार्दे, ज्ञानेश्वर राऊत, अजय राऊत, कार्तिक गनगे, महेश चौधरी, अजय काळे, महेश राऊत, संजय काळे, संतोष यादव आदींसह समता सैनिक व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.