तुळजापुर – तुळजापुर तालुक्यात सर्व नियम धाब्यावर बसवून पवनचक्की उभारण्याचे काम करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नळदुर्ग शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.सध्या तुळजापूर तालुक्यात विविध कंपन्यांकडून पवनचक्की उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये तालुक्यातील बसवंतवाडी, चिवरी, बोरनदवाडी, हगलूर, मानेवाडी, गंधोरा, मुर्दा,चिकुंद्रा, व अणदर या गावांच्या शिवरामध्ये मोठ्या प्रमाणात पवनचक्की उभारण्यात आले आहेत. एक पवनचक्की उभारण्यासाठी सात एकर जमीन अकृषी लागते. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने दीर्घकाळासाठी करार करुन घेऊन पवनचक्की उभारण्यासाठी कंपनी जमीन ताब्यात घेत आहे. या जमिनीमध्ये जाण्यासाठी अनेकांच्या जमिनीवर रातोरात मुरूम टाकून तसेच महामार्ग लागतचे झाडे तोडून पवनचक्की उभारण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने पाहात नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो रुपयांचा मुरूम रॉयल्टी न भरता तसेच महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाची परवानगी न घेता पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्या रस्ते तयार करत आहेत. भविष्यात ही मोठे त्रास दायक व डोकेदुखी ठरू शकते. त्याचबरोबर अणदूर शिवारात असलेल्या एका गॅस गोडावून परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पवनचक्की उभारण्यात आले आहेत. ह्या सर्व पवन चक्की नियमबाह्य असल्याचा आरोप शहर भाजप युवा मोर्चे अध्यक्ष गणेश मोरडे, विजयसिंग ठाकूर, अक्षय भोई आदींनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव