सोलापुरात थंडीचा पारा वाढला ; सोलापूरला भरली हुडहुडी : ११.५°c तापमानाने शहर गारठले
सोलापूर : यंदाच्या हिवाळ्यात थंडी नव-नवे विक्रम करत असताना सोमवार, १६ डिसेंबर रोजी मोसमातील सर्वात कमी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमी झालेल्या तापमानामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे.उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
त्यामुळे सोलापूरसह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली.कमी तापमानाची नोंद झाल्याने नागरिक कुडकुडत आहेत. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचे चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहत आहे.सध्या शहर व जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली असून पहाटेच्या वेळी अंगाला झोंबणारा गारवा जाणवत आहे. तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे यंदा तापमान रेकॉर्ड मोडणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात २० डिसेंबरपर्यंत संपूर्ण गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.त्यानंतर मात्र राज्याच्या तुरळक भागांमध्ये हलक्या सरी तसेच ढगाळ हवामान असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा परिणाम तापमानावरही होऊ शकतो.
थंडीच्या लाटेचा परिणाम शेजारील पुणे, अहिल्यादेवी नगर, बीड आदी जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यावरही झाला असून जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. सोमवार, १६ डिसेंबर रोजी ११.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्याला थंडीच्या लाटेच्या इशारा दिला नसला तरी थंडीची लाट आल्याचा अनुभव सोलापूरकरांना येत आहे.