२०२२ साल च्या अतिवृष्टीच्या अनुदानाचे पैसे बोगस शेतकरी दाखवून शासनाची आणि मागासवर्गीय कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी मातंग समाजाचे कुर्डुवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू
कुर्डुवाडी- बिटरगांव ता. माढा येथील तलाठी बी. आर. बनसोडे यांनी सन २०२२ साली झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानाचे पैसे बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या खात्यात पैसे टाकून तसेच बोगस दाखविण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्या संदर्भात मातंग समाजातील भूमीहीन, निराधार महिलांची व कुटूंबाची फसवणूक करणाऱ्या तलाठी व संबंधित अधिकारी यांचेवर दलित ॲक्ट नुसार कायदेशीर कारवाई करावी यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष आनंद किसन हनवते तसेच सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ईश्वर कसबे, सविता रघुनाथ कांबळे, रुपाबाई शिवाजी लोंढे यांनी प्रांताधिकारी ऑफीस समोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ईश्वर कसबे यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, नागनाथ शिवाजी लोंढे यांच्या कुटुंबाला सन २०२२ मध्ये तलाठी बी. आर. बनसोडे व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी तुम्ही दलित कुटुंबातील महिला असून तुम्हाला निराधार योजने अंतर्गत सरकारकडून मानधन मिळवून देतो असे सांगून सविता रघूनाथ कांबळे व तिची दोन मुले सानिका रघूनाथ कांबळे, रोहित रघूनाथ कांबळे व दलित वस्तीतील अल्पवयीन मुले व मुली हे सर्व दलित बांधव यांची फसवणूक करून अतीवृष्टीचे पैसे त्यांच्या नावे जमा करून त्यातील पैशाची मागणी तत्कालीन तलाठी यांनी केली व त्यांच्याकडून पैसे घेतले. काही दिवसानंतर असे लक्षात आले की, त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे हे निराधार योजनेचे नसून ते अतीवृष्टीचे आहेत.
त्यावेळी त्वरित ते पैसे शासनाच्या खात्यावर संबंधित व्यक्तीने जमा केलेले आहेत. परंतु काही रक्कम जमा करावयाची राहून गेलेली आहे. ती रक्कम तत्कालीन तलाठी व त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी या कुटुंबाकडून निराधार योनजेचा लाभ मिळवून देतो असे सांगून घेतलेली होती. त्याचे काही पुरावे देखील संबंधित व्यक्तींकडे उपलब्ध आहेत. उर्वरीत राहिलेली रक्कम ही तलाठी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांचेकडेच आहे. परंतु तरीदेखील संबंधित व्यक्तीच्या जमिनीवर बोजा चढवून त्यांच्यावर अन्याय होत आहे. हा बोजा त्वरित मागे घेऊन या प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या तलाठ्यावर व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करावी आणि मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष आनंद किसन हनवते, सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ईश्वर कसबे, सविता रघुनाथ कांबळे, रुपाबाई शिवाजी लोंढे यांनी जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आणि सदर अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे प्रसार मध्याशी बोलतांना सांगितले.