देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; आज सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांना सुट्टी; 7 दिवसांचा दुखवटा जाहीर
मुंबई – भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णायामध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मनोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सकाळी 11 वाजता मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल.
सात दिवसांचा शासकीय दुखवटा
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारने मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर सात दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकराने सुट्टी जाहीर केली आहे.
या राज्यांमध्येही आज सुट्टी
तेलंगण सरकारने आज म्हणजेच शुक्रवारी सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये सात दिवसांचा शासकीय दुखवटा असेल असंही जाहीर करण्यात आलं आहे. कर्नाटकमधील बेळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक असल्याने रोषणाई करण्यात आली होती. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर ही रोषणाई उतरवण्यात आली आहे. 27 डिसेंबर रोजी महात्मा गांधींनी 1924 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपद स्वीकारल्याच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
रातोरात राहुल गांधी, खरगे बेळगावरुन दिल्लीत
26 डिसेंबर रोजी ते राहत्या घरात बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गुरुवारी रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी दिल्लीती रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. बेळगावमधील काँग्रेसची आजची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे बैठकीसाठी बेळगावमध्ये दाखल झाले होते. मात्र रात्रीच ते दिल्लीला परतले. त्यांनी रात्री उशीरा मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं दर्शन घेत कुटुंबाचं सांत्वन केलं.
भारताच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा
मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 दरम्यान भारताचे पंतप्रधान होते. मागील काही काळापासून त्यांना वयोमानानुसार प्रकृतीसंदर्भातील समस्या जाणवत होत्या. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण्याच्या शर्यतीत ठेवण्यासाठी घेण्यात आलेला मुक्त अर्थव्यवस्थेचा निर्णय हा मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाच घेण्यात आलेला. भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या मनमोहन सिंग यांनी 2014 साली सक्रीय राजकारणामधून निवृत्ती घेतली. ते सध्या राज्यसभेचे खासदार होते.