संघर्ष आणि हिंसाचाराचा चिखल झालाय अजितदादांच्या राष्ट्रवादीत; त्या चिखलाचे शिंतोडे फडणवीस सरकारवर!!
मुंबई : संघर्ष आणि हिंसाचाराचा चिखल अजितदादांच्या राष्ट्रवादीत झालाय, पण त्याचे शिंतोडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारवर उडले आहेत.शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचे दोन फाड झाले असले तरी त्या पक्षाची मूलभूत राजकीय संस्कृती बदललेली नाही.त्या पक्षातली जातीय संघर्ष, ताणतणाव, घोटाळ्यांमधून निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध आणि हिंसाचार अजितदादांच्या राष्ट्रवादीत देखील कायम आहेत. त्याचेच पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उमटत आहेत. बीड मधले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये उघडपणे दिसणारे “सत्य” राष्ट्रवादीतल्या हिंसाचार आणि संघर्षाचे आहे.त्यात आपले राजकीय आणि सामाजिक करिअर धोक्यात आणण्याचा डाव असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केला असला, तरी वाल्मीक कराड आणि त्याचे काही साथीदार अजून सापडायला तयार नाहीत. त्यांना नेमका कोण आश्रय देतो आहे किंवा त्यांना वाचविण्याच्या निमित्ताने कोण स्वतःची कातडी वाचवू पाहत आहे??, याविषयी महाराष्ट्रात कुजबुजी पासून ते मोठमोठे बोलण्यापर्यंत सगळीकडे मुंडे + कराड याच नावांचा घोष होत असताना अजूनही महायुतीच्या फडणवीस सरकारला संतोष देशमुखच्या हत्येचे खरे गुन्हेगार सापडत नाहीत, याविषयी अचंबा व्यक्त होत आहे.
हे सगळे बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकारणातले ताणेबाणे, ताणतणाव,गैरव्यवहार, जमीन घोटाळे, संघर्ष आणि हिंसाचाराचे पडसाद आहेत, पण आता त्या वादाच्या चिखलाचे शितोंडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकार वर उडाले आहेत.समजा मोदी, शाह आणि फडणवीस यांनी अजितदादांची राष्ट्रवादी महायुती घेतली नसती, तर संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा फक्त कायदा सुव्यवस्थेवर ढकलला गेला असता, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीतल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीतल्या या संघर्षाचा महायुतीला किंबहुना भाजपला राजकीय फटका बसतो आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची प्रतिमाहानी होत आहे.
अजितदादांना “सरळ” करा
स्वतः अजितदादा या सगळ्या प्रकरणातून नामानिराळे होऊन अलिप्तपणे या प्रकरणाकडे पाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वासाठी घातक आहे!! धनंजय मुंडे यांचे सामाजिक आणि राजकीय करिअर वाचवण्यासाठी तर हे सगळे घडत असेल, तर मूळातच मुंडे यांचे कुठलेच करिअर वाचविणे हे भाजपचे काम नव्हे, ते राष्ट्रवादीचे काम आहे आणि ते त्या पक्षाने पाहून घेतले पाहिजे. राष्ट्रवादी यासंदर्भात पूर्ण हात झटकून मोकळी होऊ पाहत असेल, तर मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीला वेळीच खडसावून “जागेवर” आणले पाहिजे.अन्यथा काट्याचा नायटा होऊन महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशाचे रूपांतर अपयशात होणे अवघड नाही तसे घडवू द्यायचे नसेल, तर देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही स्थितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला लगाम घातलाच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. तिथे अजितदादांशी असलेल्या मैत्रीचा हवाला देऊन उपयोग नाही. कारण अजितदादा हे आज जरी महायुतीत आले असले, तरी ते मूळचे “पवार” आहेत, हे विसरून चालणार नाही!! किंबहुना हाच खरा धोक्याचा इशारा आहे.