मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपींना तातडीनं अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी बीडमध्य मूक मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चानंतर झालेल्या सभेत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे.नरेंद्र पाटील म्हणाले, “संतोष देशमुख ज्यांच्यामुळे आमच्यातून निघून गेला आहे, तो वाल्मिक कराड याला घो*** लावल्याशिवाय शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मनसुख हिरेन प्रकरण शोधून काढलं होते. मग, आता तुम्ही कुणाच्या दबावाखाली काम करत आहात? याचं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं पाहिजे.”
“या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे. अजितदादांनी मुंडेंना खातेवाटपत स्थान द्यायला नको होते. बीडमध्ये हत्या ही कुठल्याही एका जातीची किंवा मराठ्याची झाली नाहीतर माणुसकीची झाली आहे,” असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं.”सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आमदार आणि वेगवेगळ्या संघटनेचे लोकांनी आपली मते मांडली. मात्र, जोपर्यंत हा आका कोण आहे, हे कळत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही,” असा आक्रमक पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला आहे.