सोलापूर झेडपीच्या शासकीय वाहनांवर खाजगी ड्रायव्हर का? वाहन चालक ठेवणारा तो ‘वाझे’ कोण?
सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर कोळी, सचिव दिपक चव्हाण, विजय हराळे, अभिजित निचळ यांची उपस्थिती होती.
खाजगी वाहन चालक हे शासकीय वाहनांवर काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय वेतन घेणारे चालक मात्र बसून आहेत. जिल्हा परिषदेतील वाहन चालक यांना मुख्यालय व तालुकास्तरीय शासकीय वाहनांवर नियुक्ती मिळावी अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनावर सुद्धा खाजगी वाहन चालक अनेक वर्षापासून काम करतो, तसेच कार्यकारी अभियंता यांच्या ही शासकीय वाहनावर खाजगी वाहन चालक आहे असे अनेक खाजगी वाहन चालक अधिकाऱ्यांच्या वाहनांवर काम करत आहेत. अनेक वाहन चालकांना मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांवर चालक म्हणून काम करण्याची इच्छा असते परंतु ती पूर्ण होताना दिसत नाही.जिल्हा परिषदेमध्ये खाजगी वाहन चालकांना मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर लावणारा एक ‘वाझे’असल्याचे पाहायला मिळते. तो अधिकाऱ्यांच्या मागे पुढे करून स्वतःच्या अनेक गाड्या लावून आपल्या मर्जीतील चालक लावून खिशा भरत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. यावर आता शिस्तीचे समजले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे लक्ष घालणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.