सोलापुरात पाच दिवस गावरान मेजवानी ; असा असेल रुक्मिणी महोत्सव
सोलापूर : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंर्तगत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री दि.16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान वोरोनाका प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
मिनी सरस व रूक्मिणी महोत्सव बाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्ह्यातून 65 व पुणे विभागातील इतर जिल्ह्यातून 10 स्टॉल असे एकूण 75 स्टॉल लावण्यात येणार आहेत.महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो.
या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू , भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू , कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इ.वस्तू यांचा समावेश आहे.या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात.शिवाय, घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील.हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतील.
ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. तसेच सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव चा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम दि.20जानेवारी रोजी ठेवण्यात आला आहे.
या प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ यांची चव शहरी भागातील नागरिकांना चाखण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पांढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील.याशिवाय ग्रामीण महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळणार आहे. तरी नागरीकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे यांनी केले आहे.
यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडीवळी, अनिता माने, अमोल गलांडे इ उपस्थित होते.