माळशिरस (प्रतिनिधी)- माळशिरस पंचायत समिती बांधकाम उप विभागातील कनिष्ठ अभियंता शशिकांत सयाजी चौगुले रा. माळीनगर, ता. माळशिरस, पन्नास हजाराची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात गुरुवार दि.16/01/2025 रोजी दुपारी अडकलेला आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपअधीक्षक शितल दानवे, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. माळशिरस पंचायत समिती येथे लाचखोर शशिकांत सयाजी चौगुले यांनी तक्रारदार यांना एक लाख रुपये लाचेची मागणी केलेली होती. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे मोजमाप व बिले काढण्याकरता पैशाची मागणी केलेली होती. तक्रारदार यांनी पन्नास हजार रुपये दिल्यानंतर अँटी करप्शन यांनी त्यांना जाळ्यात अडकवले. त्यामुळे माळशिरस पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज गुरुवार असल्याने माळशिरस पंचायत समितीमध्ये सर्व अधिकारी उपस्थित असतात. भर दुपारी अँटी करप्शन यांनी लाचखोर शशिकांत सयाजी चौगुले यांना अडकविल्यानंतर पंचायत समिती मोकळी झालेली होती.लाचलुचपत प्रतिबंधक अँटी करप्शन सापळा विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस हवालदार शेलार, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माने, पोलीस नाईक किरण चिमटे यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे गुन्हा नोंद करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे.