चंद्रभागेत सोडले पाणी; पंढरपूर येथे माघी वारीनिमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज
पंढरपूर- मघा यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागेत स्नान करतात. भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करता यावे, यासाठी दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून २४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळ येऊन पाणी जास्त काळ साठल्याने पाणी घाण झाले होते. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुरसाळे व नगर परिषदेच्या बंधाऱ्यांमधून तातडीने सहा दरवाजे उघडून नदीपत्रामध्ये पाणी सोडण्याबाबत सूचना दिली. त्या अनुषंगाने गुरसाळे व नगर परिषदेच्या बंधाऱ्यामधून भाविकांच्या सोयीसाठी बंधाऱ्याचे सहा दरवाजे उघडून चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
१३ ठिकाणी पार्किंगची सोय
शहरामध्ये येणारी वाहने मुख्य रस्त्यावर किंवा प्रदक्षिणा मार्गावर येऊन भाविकांना चालताना अडथळा अथवा त्रास होऊ नये म्हणून सर्व ठिकाणी लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहेत. यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भाविकांच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी १३ ठिकाणी पाकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाळवंटात येणाऱ्या यात्रेकरूंना 3 चालण्यासाठी व पाण्याचे टँकर, जेटिंग मशीन, आरोग्य विभागाची वाहने जाणे-येणेसाठी जुना पूल ते पुंडलिक मंदिरापर्यंत रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. तसेच पुंडलिक मंदिर ते दगडी पुलापर्यंत ९ हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर २०० वॅट एलईडी दिवे लावण्यात आले.
लखूबाई मंदिर घाट, उद्धव घाट, कुंभार घाट व चंद्रभागा घाट चार ठिकाणी स्टेडियमवर जसे फ्लड लाइट लावले जातात तसे फ्लड लाइटचे मोठे दिवे बसविण्यात आले आहेत. सदर दिव्यांचा प्रकाश संपूर्ण वाळवंटात पडत आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरूंच्या सोयीसाठी संपूर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकरमध्ये १६० एलईडी दिवे व ६ हायमास्ट बसविण्यात आले आहेत.
रिसायकलिंग करून शुद्ध पाण्याची सोय
माघी यात्रेमध्ये भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच नदीपात्रामध्ये सध्या पाण्याचे रिसायकलिंग करून पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा बसवण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून, सदरची यंत्रणा आषाढी यात्रेपूर्वी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.