माघ एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची पूजा संपन्न

माघ एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची पूजा संपन्न

पंढरपूर – माघ शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

यावेळी आमदार तुकाराम काते, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शंकर पटवारी, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

माघ शुद्ध जया एकादशी निमित्त मुख्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अष्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, हिरवा पाला, सूर्य फुल, कलकत्ता शेवंती जिप्सी, कामिनी इत्यादी सुमारे दिड टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. श्रींचा गाभारा, सोळखांबी श्री संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. सदरची सजावट पुणे येथील भाविक सचिन आण्णा चव्हाण, संदिप विठ्ठल पोकळे व युवराज विठ्ठल सोनार या भाविकांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.

माघ शुद्ध जया एकादशी निमित्त मुख्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल

माघ एकादशीला राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. भाविकांना ध्वनिक्षेपकाव्दारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व चहा वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

65 एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदीर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदूमून गेली आहे. पहाटेपासून चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो वारकरी दिंड्यासह प्रदक्षिणा मार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पुर्ण करत आहेत. भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पददर्शन व मुख दर्शन घेत आहेत. चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर भाविकांसह टाळ मृदूंगाच्या जयघोषाने दुमदुमून निघाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!