हाताचा पंजा कापून काढल्या प्रकरणी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
सोलापूर प्रतिनिधी- यात आरोपी नामे लक्ष्मण महादेव माने व केशव विजय चव्हाण रा. सोलापूर या आरोपींनी हाताचा पंजा कापून फिर्यादीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी सोलापुर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मोहिते साहेब यांनी जामीन अर्ज फेटाळला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी हे अर्धनारी, ता. मोहोळ येथे राहण्यास असून ते शेती करून त्यांची उपजीविका करतात. तसेच त्यांच्या फिर्यादीच्या भावकीतील भारत शंकर मांडले हा त्याच्या कुटुंबासोबत फिर्यादी ये जा करणाऱ्या रस्त्यावर राहतो. मागील तीन महिन्यापासून भारत मंडले यांची सून पूनम मंडले हे फिर्यादी यांच्या भावाच्या लहान मुलांना रस्त्याने येत जाता शिवीगाळ दमदाटी करत होती. म्हणून फिर्यादी च्या भावाने तिला समजावून सांगितले होते. दिनांक ११/02/२०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जेवण करून घरी झोपला असता रात्री घराबाहेर आरडा ओरडा व शिवीगाळीचा आवाज ऐकून फिर्यादी व त्याची पत्नी असे घराबाहेर आले त्यावेळी रात्रीचे १.०० वाजले होते. घराबाहेर पहिले असता फिर्यादीचा भाऊ रामलिंग यास विष्णू मंडले, विष्णू मंडले याचा मेहुणा विशाल, समाधान मंडले, भारत मंडले व इतर ३ ते 4 लोक हातात कुऱ्हाड, तलवार, काठी, दगड घेऊन शिवीगाळ, दमदाटी करत होते त्यावेळी फिर्यादीच्या शेजारी राहणारे बाळू चव्हाण हे पण घराबाहेर आले त्यावेळी फिर्यादी व बाळू चव्हाण यांनी फिर्यादीचा भाऊ रामलिंग यास काय झाले असे विचारले असता रामलिंग याने विष्णू मंडलेच्या बायकोने रामलिंग च्या लहान मुलांना शाळेवरून जाताना शिवीगाळ व मारहाण केली आहे व मी सदर प्रकाराबाबत विचारण्यास गेलो असता मला सुद्धा शिवीगाळ केली असे सांगितले. फिर्यादिने घडल्या प्रकाराबाबत समाज अध्यक्ष गोविंद चव्हाण यांना हि सांगितले होते. फिर्यादीने विष्णू मंडले, समाधान मंडले, भारत मंडले व त्याचा मेहुणा विशाल यास आपण सगळे भाव भावकी असून एकाच गावात राहतो भांडण करून काय करायचे आहे असे म्हणत असताना विष्णू मंडले याने फिर्यादी ला तुम्हा तिघा भावांना लय मस्ती आली आहे असे म्हणून फिर्यादीच्या डाव्या हातावर कुऱ्हाडीने मारल्याने फिर्यादीचा डावा हात मनगटापासून तुटून खाली पडला व विशाल याने तलवारीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी करून फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व बाळू चव्हाण यास समाधान मंडले याने डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले तसेच रामलिंग यास भारत मंडले, पूनम मंडले व सासू यांनी काठीने व इतर ३ ते 4 लोकानी हातानी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद कामती पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
सदर कामी आरोपी नामे लक्ष्मन माने व केशव विजय चव्हाण यांनी जामीन मिळणे कामी सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केलेला होता.
यात आरोपी तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपींची नावे फिर्यादीत नमूद नाहीत तसेच त्यांचा आरोपीस गंभीर जखमी केल्याबाबतचा कोणताही खुलासा फिर्यादी मध्ये नमूद केलेला नाही. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा.
सदर जामीन अर्जास मूळ फिर्यादीतर्फे व सरकारपक्षातर्फे तीव्र हरकत घेण्यात आली. तसेच सदरचा हल्ला हा प्राणघातक असून यातील जखमी अजूनही कोमात असल्यामुळे त्याच्या जीवितास धोका असून सदर आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास सदर केस मधील साक्षीदारांवर जामिनावर सोडल्यास दबाव अणन्यापोटी सदर आरोपींकडून अघटीत घटना घडू शकते.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मोहिते साहेब यांनी आरोपी नामे आरोपी नामे लक्ष्मन महादेव माने व केशव विजय चव्हाण रा. सोलापूर यांचा हाताचा पंजा कापून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला.
यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. सारंग काकडे, ॲड. सुमित लवटे, ॲड. शिवाजी कांबळे तसेच सरकार पक्षातर्फे ॲड. गुजरे यांनी काम पाहिले.