बोगस खरेदी खत केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

बोगस खरेदी खत केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

सोलापूर प्रतिनिधी – यातील संशयित आरोपी नामे महावीर अशोक बोरा रा. सोलापूर याची बोगस खरेदी खत केल्याप्रकरणी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, फिर्यादी यांनी सन १९८१ साली अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली व सदर संस्थेची नोंदणी उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांचेकडे केली आहे. सन १९८३ रोजी फिर्यादी यांनी अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन म्हणून सिद्धाराम भोगगुंडे यांच्याकडून मौजे कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर येथील जमीन विकत घेतली होती. सदर जमिनीच्या ७/१२ उताऱ्याला फिर्यादीचे नाव आहे. यातील इतर सहआरोपी हे फिर्यादी यांचे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी यांची फसवणूक आणि स्वताचा आर्थिक फायदा करण्याचे वाईट उद्देशाने व हेतूने आरोपींनी फिर्यादी यांची परवानगी न घेता नमूद जमिनीपैकी ४० आर जमिनीची खरेदी खताची बोगस कागदपत्रे तयार केली तसेच सदरची जमीन कै. सिद्धलिंग कोळी यांना मा. सह दुय्यम निबंधक (वर्ग २) सोलापूर दक्षिण – २ यांचे कार्यालयात रजिस्टर खरेदी खत करून विकत दिली. खरेदी खताचे दिवशी मूळ मालक फिर्यादी म्हणून यातील सह आरोपी हा मा. सह दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहिला. तसेच सदर खरेदी खतात लिहून देणार म्हणून फिर्यादी स्वताच आहे असे भासवून यातील सह आरोपीने खरेदी दस्तावर सही केली. सदर खरेदी खतावर साक्षीदार म्हणून यातील आरोपी नामे महावीर अशोक बोरा याला सदर प्रकरणात सहभागी करून घेतले. म्हणून भा.द.वि. कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ३४ प्रमाणे सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.
सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादीची पत्नी, तत्कालीन सह दुय्यम निबंधक व सदर केस चे तपासाधिकारी हे होते.

सदर खटल्यात आरोपी च्या वकिलांनी घेतलेली फिर्यादीच्या पत्नीची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर फिर्यादीच्या पत्नीने उलटतपासणीमध्ये अनेक महत्वाच्या बाबी मान्य केल्या. सदर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करतेवेळेस अनेक महत्वाचे मुद्दे मांडले ते अश्याप्रकारे कि कुठलाही अभिलेख किवा दस्त रजिस्टर करतेवेळी विशेषतः खरेदी खताचा दस्त नोंदणी करतेवेळी त्यातील साक्षीदारास त्या खरेदी खतातील नमूद प्रोपर्टीच्या मूळ मालकाबद्दलची माहिती असणे हे बंधनकारक नाही. त्यापोटी अनेक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यात आले.

सदर बाबींचा विचार करून यातील संशयित आरोपी नामे महावीर अशोक बोरा रा. सोलापूर यांची मा. मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपींतर्फे अँड. अभिजित इटकर, अँड. दीपक टक्कळगी, अँड. राम शिंदे, अँड. संतोष आवळे, अँड. शिवाजी कांबळे अँड. फैयाज शेख, अँड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!